काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड
परराज्यातून कामासाठी आलेल्या मजुरांना एकटे गाठून मारहाण, धमकी आणि जबरदस्तीने ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात पैसे लुटणाऱ्या दोन सराईत आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने अटक केली आहे. आरोपींकडून तीन मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे केशव दशरथ शेटे (वय ४६, रा. कुदळे कॉलनी, पिंपरी गाव) आणि राजेश अनिल कुमार (वय ४५, रा. ताडीवाला रोड, पुणे स्टेशन परिसर) अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी महाळुंगे-तळवडे रस्त्यावरील महिंद्रा कंपनीच्या गेट क्रमांक १ जवळ दोन दुचाकींवरून आलेल्या चार जणांनी एका मजुराला अडवून त्याचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावला. फिंगरप्रिंटद्वारे मोबाईल अनलॉक करून त्याच्या फोनपे खात्यातील २५ हजार रुपये गुगल पेच्या क्यूआर कोडद्वारे स्वतःच्या खात्यात वर्ग करण्यात आले. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ ने तपास सुरू केला. तपासादरम्यान पैसे स्वीकारण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईलही चोरीचा असल्याचे उघड झाले. आरोपी ऑनलाइन मिळालेली रक्कम विविध मनी ट्रान्सफर केंद्रांतून रोख स्वरूपात काढत असल्याचेही तपासात समोर आले.
आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सुमारे ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. घटनास्थळे आणि पैसे काढलेल्या ठिकाणांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिस चौकशीत आरोपी व त्यांच्या साथीदारांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक असे एकूण तीन जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
हे आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, गुरुवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी परराज्यातील मजुरांना लक्ष्य करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. जबरदस्तीने ऑनलाइन अथवा रोख रक्कम उकळल्यानंतर चोरीच्या मोबाईलवरील गुगल पे खात्याचा वापर करून पैसे स्वीकारले जात आणि त्यानंतर मनी ट्रान्सफर केंद्रांमधून ती रक्कम रोख स्वरूपात काढली जात होती. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







