काशिनाथ शिंदे: पिंपरी
पिंपरी-चिंचवड : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या “अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व” उपक्रमाच्या प्रसिद्धीबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप प्रबोधन पर्वाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर करून तातडीने व्यापक प्रसिद्धी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.
दाखले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रबोधन पर्वांतर्गत आयोजित व्याख्याने, परिसंवाद, नाट्यप्रयोग, कविसंमेलने आदी कार्यक्रमांची पुरेशी प्रसिद्धी करण्यात आलेली नाही. बॅनर, पोस्टर, समाजमाध्यमे तसेच स्थानिक केबल वाहिन्यांवर कार्यक्रमांची माहिती प्रभावीपणे प्रसारित न झाल्याने नागरिकांपर्यंत कार्यक्रमांची माहितीच पोहोचली नाही.
शाळा, महाविद्यालये, वसाहती आणि झोपडपट्टी परिसरातही कार्यक्रमांची माहिती न पोहोचल्याने विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिक या उपक्रमांपासून वंचित राहिल्याचा आरोप त्यांनी केला. प्रसिद्धीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध असतानाही त्याचा प्रभावी वापर न करता केवळ औपचारिकता पार पाडण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
अण्णाभाऊ साठे यांचे विचार वंचित, शोषित आणि बहुजन समाजासाठी प्रेरणादायी असून अशा महापुरुषांच्या प्रबोधन पर्वाची प्रभावी प्रसिद्धी न होणे हा त्यांच्या विचारांचा अवमान असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महापालिका प्रशासनाने प्रबोधन पर्वाच्या उर्वरित कालावधीत तातडीने व्यापक प्रसिद्धी मोहीम राबवावी, संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच भविष्यात सर्व महापुरुषांच्या जयंती व स्मृतिदिन कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी निश्चित वेळापत्रक तयार करावे, अशी मागणी युवराज दाखले यांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.







