काशिनाथ शिंदे: चिखली पिंपरी चिंचवड
चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत आरोपीला चिखली पोलिसांच्या गुन्हे तपास पथकाने कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील कलगी येथून अटक केली. अंबादास राजू राठोड (वय २२, रा. रामदास नगर, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(२) तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर राठोड हा पोलिसांना चकवा देत सतत ठिकाण बदलून फरारी होता.
आरोपीचा शोध घेण्यासाठी चिखली पोलिसांचे गुन्हे तपास पथक त्याच्या मागावर होते. विशेष म्हणजे, आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही तांत्रिक साधनांचा आधार न घेता पारंपरिक खबऱ्यांचे आणि गुप्त बातमीदारांचे नेटवर्क सक्रिय करण्यात आले. त्यातून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपी कर्नाटक राज्यातील कलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे समोर आले.
माहितीची खात्री होताच पोलिसांनी संबंधित परिसरात सापळा रचला. पोलिसांच्या हालचालींचा सुगावा लागू न देता राठोडला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सहा महिन्यांपासून फरारी असलेल्या मोक्का आरोपीला परराज्यातून अटक करण्यात आल्याने चिखली पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे.
ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-४) श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त (देहूरोड विभाग) प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, पोलीस हवालदार विनोद होनमाने, प्रवीण भोमाळे, अरुण साबळे आणि कंठया स्वामी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.मोक्का गुन्ह्यातील फरारी आरोपीला परराज्यातून जेरबंद केल्याने चिखली पोलिसांनी गुन्हेगारांना पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे.
मोक्का गुन्ह्यातील फरारी आरोपीला परराज्यातून जेरबंद केल्याने चिखली पोलिसांनी गुन्हेगारांना पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे.







