काशिनाथ शिंदे : पिंपरी
पिंपरी-चिंचवड : विद्यार्थ्यांना घडविणे म्हणजेच राष्ट्र घडविणे, या विचाराला केंद्रस्थानी ठेवून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्योती लक्ष्मण दवणे (घोलप) यांची पुणे जिल्हा परिषदेत केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने आकुर्डी येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष रघुनाथ रोकडे यांच्या हस्ते ज्योती दवणे यांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. “ज्योती दवणे यांची केंद्रप्रमुखपदी झालेली निवड ही त्यांच्या कर्तृत्वाची, गुणवत्तेची आणि निस्वार्थ सेवाभावाची गौरवशाली पावती आहे,” असे रोकडे यांनी यावेळी सांगितले.
संघटनेचे राष्ट्रीय सचिव प्रमोद केसरकर यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत, महाराष्ट्रभर संघटनेने केलेल्या भरीव कामामुळे संघटना अग्रगण्य ठरली असून, हे सामाजिक कार्य अखंडपणे सुरू ठेवण्याची ग्वाही दिली.
राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांनी संघटनेच्या माध्यमातून हाताळण्यात आलेल्या विविध प्रकरणांची माहिती देत, मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे आवाहन केले. राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत यांनी ज्योती दवणे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक केले.
यावेळी संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, तुळशीराम घोलप, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन गाडे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड शहर महिला उपाध्यक्ष अरुणा गायकवाड होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांतीलाल सोरटे यांनी केले.
कार्यक्रमाला मुळशी तालुका अध्यक्ष विशाल भानुसे, मावळ तालुका अध्यक्ष कांतीलाल सोरटे, खेड तालुका अध्यक्ष अतुल दवणे, सिंदखेड तालुकाध्यक्ष प्रकाश बागल पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन गाडे पाटील, पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष केतन राजने, मावळ तालुका उपाध्यक्ष प्रतीक कांबळे, पुणे जिल्हा सचिव डॉ. सतीश नगरकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अप्पासाहेब कांबळे, मुळशी तालुका सचिव अविनाश भोसले, खेड तालुका उपाध्यक्ष संतोष दवणे, संघटक दत्तात्रय भोसले, खेड तालुका सचिव गोविंद लिंगायत, मावळ तालुका उपाध्यक्ष रवींद्र आडकर, खेड तालुका कायदे सल्लागार विठ्ठल नाणेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.







