Oplus_131072
काशिनाथ शिंदे तळेगाव दाभाडे : धार्मिक स्थळांना लक्ष्य करणाऱ्या दोन अट्टल चोरांना अवघ्या ४८ तासांत जेरबंद करत तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. इंदुरी येथील ग्रामदैवत कडजाई माता मंदिरातील दानपेटी चोरी आणि तळेगाव दाभाडे येथील तुळजाभवानी माता मंदिरातील देवीचा चांदीचा मुकुट चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे १ लाख ४९ हजार रुपये किमतीचा १ किलो २५० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
१२ जून २०२६ रोजी मध्यरात्री इंदुरी येथील ग्रामदैवत कडजाई माता मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले.
तपासादरम्यान आरोपी चाकण परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या दोन स्वतंत्र पथकांनी सापळा रचून कुणाल बाळू वीर (वय २३, रा. सुंबरेनगर, चाकण) आणि लोबो उर्फ सुर्या श्रीमंतहो दास (वय २६, रा. कडाचीवाडी, चाकण) यांना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीत हेच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
सखोल चौकशीदरम्यान आरोपींनी तळेगाव दाभाडे व दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला देवीचा चांदीचा मुकुट आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
या कारवाईमुळे तळेगाव एमआयडीसी, तळेगाव दाभाडे आणि दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यांतील एकूण तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे १० जून रोजी निघोजे येथील शिवपार्वती मंदिरात दानपेटी फोडून चोरी करताना आरोपींनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केली होती.
या धडाकेबाज कारवाईमुळे धार्मिक स्थळांवरील चोरीच्या घटनांमध्ये सक्रिय असलेल्या टोळीचा पर्दाफाश झाला असून आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली.
