काशिनाथ शिंदे: पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनासह मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संस्थेत सुमारे ४४० विद्यार्थी आणि ४६ स्टाफ असल्याचे सांगितले जात असताना विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा आणि नियमित प्रशिक्षण मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सनय छत्रपती शासन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, ITIमधील बाथरूमची स्वच्छता आणि अवस्था खराब असून दरवाजे व गेटचीही दुरवस्था झाली आहे. पिण्याच्या पाण्याची अपुरी सुविधा, डासांचा मोठ्या प्रमाणात त्रास तसेच प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य विद्यार्थ्यांना स्वतःच्या पैशातून खरेदी करावे लागत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
याशिवाय नियमित प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षक उपलब्ध नसल्याची तक्रारही विद्यार्थ्यांनी केली आहे. प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांकडून कंपन्यांचे काम करून घेतले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा टाकला जातोय का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
₹५०० विद्यावेतनाचा हिशोब कधी मिळणार?
विद्यार्थ्यांना दरमहा देण्यात येणाऱ्या ₹५०० विद्यावेतनाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. किती विद्यार्थ्यांच्या खात्यावर विद्यावेतन जमा झाले, किती विद्यार्थ्यांचे विद्यावेतन प्रलंबित आहे, किती रक्कम थकीत आहे आणि थकबाकी असल्यास त्याला जबाबदार कोण, याचा स्पष्ट खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.
प्रशासनासमोर विद्यार्थ्यांच्या सुविधांचा पाढा
मोरवाडी ITIमधील बाथरूम, पिण्याचे पाणी, दरवाजे, गेट, डासांचा त्रास, प्रशिक्षण साहित्य आणि शिक्षकांची उपलब्धता या सर्व बाबींची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वस्तुनिष्ठ चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी करण्यात आली.
एकीकडे ४४० विद्यार्थी आणि ४६ स्टाफ असल्याचे सांगितले जाते; मात्र विद्यार्थ्यांना नियमित प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षक उपलब्ध नसल्याची तक्रार होत असेल, तर या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल प्रा. नामदेवराव जाधव यांनी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांच्या हक्काचे विद्यावेतन वेळेत मिळणे, प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे आणि संस्थेतील मूलभूत सुविधा सुधारणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे मोरवाडी ITIची वरिष्ठ पातळीवरून स्वतंत्र पाहणी करून विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारींची चौकशी करावी, विद्यावेतनाचा संपूर्ण हिशोब जाहीर करावा आणि आवश्यक त्या सुधारणा तातडीने कराव्यात, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या प्रशिक्षण संस्थेतच सुविधांचा अभाव असेल, तर प्रशिक्षणाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे आता प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन नेमकी कोणती कारवाई करते, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.







