नागपूर : नागपूर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर अंकुशराव झोल यांचा शासकीय निवासस्थानी दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस लाईन टाकळी येथील शासकीय क्वार्टरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. झोल हे नागपूर पोलीस आयुक्तालयातील अर्ज शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.
दिवसभराचे कर्तव्य पूर्ण करून झोल रात्री शासकीय निवासस्थानी परतले. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसोबत जेवण केले. जेवणानंतर त्यांची पत्नी मुलांना झोपवण्यासाठी बेडरूममध्ये गेली. काही वेळाने त्या बाहेर आल्यानंतर झोल हे क्वार्टरमध्ये गंभीर अवस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी मदतीसाठी धाव घेतली. सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने नागपूर पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, माहिती मिळताच गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शासकीय निवासस्थानाची पाहणी करून तपासासाठी आवश्यक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली.
प्राथमिक तपासात घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे झोल यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास गिट्टीखदान पोलीस करीत आहेत.







