काशिनाथ शिंदे
मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएने आता थेट बॉलिवूडच्या बड्या कलाकारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या जाहिरातीद्वारे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या पानमसाला उत्पादनाची अप्रत्यक्ष किंवा ‘सरोगेट’ जाहिरात केली जात असल्याचा एफडीएचा प्राथमिक आक्षेप आहे.
नेमका आक्षेप काय?
एफडीएच्या मते, जाहिरातीत ‘विमल इलायची’ या नावाचा वापर असला तरी ‘विमल’ या ब्रँडची पानमसाल्याशी असलेली ओळख ग्राहकांच्या मनात निर्माण होऊ शकते. त्यामुळे कायदेशीर उत्पादनाच्या जाहिरातीच्या माध्यमातून प्रतिबंधित उत्पादनाची ब्रँड ओळख अप्रत्यक्षपणे मजबूत केली जात असल्याचा दावा एफडीएने केला आहे.
‘सरोगेट जाहिरात’ म्हणजे काय?
एखाद्या प्रतिबंधित किंवा जाहिरातीवर निर्बंध असलेल्या उत्पादनाचा थेट प्रचार करता येत नसल्यास, त्याच ब्रँडच्या दुसऱ्या कायदेशीर उत्पादनाची जाहिरात करून मूळ उत्पादनाची ब्रँड ओळख आणि बाजारातील उपस्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यालाच सरोगेट किंवा अप्रत्यक्ष जाहिरात म्हटले जाते.
याच मुद्द्यावर महाराष्ट्र एफडीएने ‘विमल इलायची’च्या जाहिरातीची चौकशी सुरू केली आहे.
१५ दिवसांत खुलासा द्या!
एफडीएने तिन्ही कलाकारांना नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. त्यासोबत जाहिरात करार, मोहिमेची माहिती, उत्पादनाचे तपशील, मानधनाची माहिती तसेच संबंधित जाहिरात एजन्सी व ब्रँड मालकाशी संबंधित कागदपत्रे सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. जाहिरात आणि त्यासंबंधित प्रचारात्मक मजकूर सोशल मीडिया खात्यांवरून हटवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
पुढे काय होणार?
नोटीस मिळाल्यानंतर शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांचा खुलासा एफडीए तपासणार आहे. त्यानंतर जाहिरात नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही, याबाबत पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणात बॉलिवूड कलाकारांची जबाबदारी आणि सेलिब्रिटी जाहिरातींच्या कायदेशीर मर्यादा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.







