काशिनाथ शिंदे : दापोडी
राहुल साबळे यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश हाके यांचे दापोडी पोलिसांना निवेदन, १० दिवसांत कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ह प्रभागात लाइटिंगचे काम सुरू असताना कामगार राहुल साबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना केवळ अपघात म्हणून न पाहता कामगारांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटींची चौकशी करून संबंधित कार्यकारी अभियंता राऊत आणि संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी निलेश एकनाथ हाके यांनी दापोडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, कामगारांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट व अन्य आवश्यक संरक्षक साधने देण्यात आली होती का, तसेच त्यांना आवश्यक सुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले होते का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कामगारांच्या जीविताची जबाबदारी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर असताना सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाले असे तपासात आढळल्यास, संबंधितांच्या निष्काळजीपणामुळे राहुल साबळे यांचा मृत्यू झाला का, याची कायदेशीर चौकशी करून भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हाके यांनी केली आहे.
पुरावे तातडीने सुरक्षित करण्याची मागणी
घटनास्थळाचा पंचनामा करून तेथील पुरावे सुरक्षित करावेत. तसेच कामाची वर्क ऑर्डर, करारनामा, सुरक्षा अटी, कामगारांची नोंद, सुरक्षा प्रशिक्षणाच्या नोंदी आणि सुरक्षा उपकरणांची उपलब्धता यांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, फोटो, व्हिडिओ, मोबाईल रेकॉर्डिंगसह इलेक्ट्रॉनिक पुरावे तातडीने सुरक्षित करावेत. कोणताही पुरावा नष्ट अथवा बदलला जाऊ नये आणि दोषींना संरक्षण मिळू नये, यासाठी संबंधित कागदपत्रे व पुरावे पोलिसांनी ताब्यात घ्यावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दहा दिवसांची मुदत; अन्यथा उपोषण
या प्रकरणात प्रशासनाने केवळ प्रशासकीय कारवाईवर न थांबता जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भूमिका हाके यांनी घेतली आहे. निवेदन प्राप्त झाल्यापासून दहा दिवसांच्या आत गुन्हा दाखल करून ठोस कारवाई करण्यात आली नाही, तर राहुल साबळे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही व सनदशीर मार्गाने उपोषणाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कामगारांच्या सुरक्षेशी तडजोड करून एखाद्याचा जीव गेला असल्यास त्याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.







