काशिनाथ शिंदे : चाकण
चाकण-महाळुंगे एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि मोठमोठ्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात गणेश बोत्रे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.
चाकण-महाळुंगे एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या कामगारांसह वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी वाहतूक संघटनेने केली आहे.
या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत आणि नागरिकांना सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विनोद वरखडे, संतोष शेठ मायने, आप्पासाहेब दौंडे, खेड-आळंदी सेक्रेटरी संतोष शेठ क्षिरसागर, अनिल मामा ढोरे आदी उपस्थित होते.
गणेश बोत्रे यांच्या उपोषणाच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने ठोस कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.







