- खासगी कंपन्यांच्या बसांसाठी स्वतंत्र थांबे व पार्किंगची मागणी; विनोद वरखडे यांचे वाहतूक पोलिसांना निवेदन
काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक परिसरातील प्रमुख रस्त्यांवर खासगी कंपनी बसेसच्या बेशिस्त थांब्यांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून, नागरिक आणि वाहनचालक हैराण झाले आहेत. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत मुख्य रस्ते, चौक आणि वळणांवरच बसेस उभ्या राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या पार्श्वभूमीवर खासगी कंपनी बसेससाठी स्वतंत्र थांबे आणि पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) वाहतूक विभागाचे शहराध्यक्ष विनोद शंकरराव वरखडे यांनी केली आहे.
याबाबत वरखडे यांनी वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष अकबर शेख उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरात देहू-आळंदी रस्ता, कुरुळी, मोशी, निघोजे, भारतमाता चौक, तळवडे तसेच चिखलीतील भोई चौक परिसरात खासगी कंपनी बसेसमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. या भागातील हजारो कंपन्यांमध्ये लाखो कामगार कार्यरत असून, त्यांच्या ने-आणीसाठी शेकडो खासगी बसेस धावतात.
सकाळी साडेसहा ते नऊ आणि सायंकाळी साडेचार ते रात्री आठ या गर्दीच्या वेळेत कंपन्यांच्या बसेस प्रमुख चौक, वळण रस्ते आणि मुख्य मार्गांवरच थांबतात. त्यामुळे बसच्या मागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि अनेकदा वाहतूक ठप्प होते. परिणामी वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रस्ता ओलांडताना अपघाताचा धोका
कंपनी बसमध्ये चढण्यासाठी कामगार अनेकदा गर्दीच्या रस्त्यावरून घाईगडबडीत रस्ता ओलांडतात. त्यामुळे पादचारी आणि इतर वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्याच्या वेळेत ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कंपन्यांच्या आवारात बसेससाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. देहू-आळंदी, मोशी-चाकण, निघोजे, कुरुळी तसेच एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांवर ही समस्या दररोज निर्माण होत असल्याचा दावा वरखडे यांनी केला आहे.
नियोजित थांबे, स्वतंत्र पार्किंगची मागणी
वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी, केवळ तात्पुरत्या उपायांनी प्रश्न सुटणार नाही. खासगी कंपनी बसेससाठी नियोजित थांबे निश्चित करावेत तसेच स्वतंत्र पार्किंग क्षेत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वरखडे यांनी केली आहे.
यामुळे औद्योगिक परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासोबतच नागरिक, वाहनचालक आणि शालेय विद्यार्थ्यांना दररोजच्या वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.







