काशिनाथ शिंदे
पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना थेट इशारा दिला आहे. “ओबीसी नेत्यांनी मराठ्यांच्या विरोधात जाऊ नये. मराठ्यांच्या नादाला लागून आपले राजकीय करिअर उद्ध्वस्त करू नका,” असे आवाहन करत जरांगे यांनी मराठा-कुणबी समाजाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीका केली.
मनोज जरांगे म्हणाले की, अनेक नेते मंत्री आणि आमदार झाल्यानंतर मराठा समाजाच्या विरोधात काम करत आहेत. राजकीय पदे मिळाल्यानंतर समाजाच्या प्रश्नांकडे वेगळ्या पद्धतीने पाहिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “तुम्ही मंत्री-आमदार झाल्यानंतर मराठ्यांच्या विरोधात काम करत आहात. मराठा-कुणब्यांच्या नादाला लागायचे नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात गेल्या काही काळापासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मराठा समाजाच्या मागण्यांना विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांनी त्याची राजकीय किंमत मोजावी लागू शकते, असा सूचक इशाराही त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आला.
जरांगे यांनी पुढे अत्यंत आक्रमक शब्दांत भूमिका मांडताना, “अन्यथा तुम्हाला कांड्यावर मोजण्याइतकेदेखील ठेवणार नाही,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची भूमिका घेतलेल्या जरांगे यांनी यापूर्वीही विविध राजकीय नेत्यांवर टीका केली आहे. आता त्यांनी ओबीसी नेत्यांनाच लक्ष्य करत मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेऊ नये, असा स्पष्ट संदेश दिल्याने या वक्तव्यावर ओबीसी नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा राजकीय वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत असून, आगामी काळात या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.







