काशिनाथ शिंदे
पुणे : माजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या तक्रारीनंतर कथित बदनामीकारक सोशल मीडिया पोस्टप्रकरणी पुणे पोलिसांनी १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात सुषमा अंधारे, रुपाली पाटील-ठोंबरे, दीपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिराजे, हनुमंत गळगटे आणि वर्षा कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काही सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
चाकणकर यांच्या आरोपानुसार, एका सार्वजनिक कार्यक्रमातील छायाचित्रे आणि व्हिडिओंचा वापर करून त्यांच्याशी संबंधित नसलेले आरोप करणाऱ्या पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आल्या. या पोस्टमुळे आपली बदनामी होत असल्याचा आरोप करत त्यांनी पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीसोबत सोशल मीडिया पोस्टचे स्क्रीनशॉट तसेच अन्य पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत. पोलिसांनी हे पुरावे ताब्यात घेतले असून, संबंधित पोस्ट कोणी तयार केल्या, त्या सोशल मीडियावर कोणी प्रसारित केल्या आणि त्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील सर्व संबंधितांची भूमिका तपासल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास सुरू असल्याने गुन्ह्यातील आरोपांची सत्यता तपासाच्या निष्कर्षानंतर स्पष्ट होणार आहे.
या कारवाईमुळे सोशल मीडियावर राजकीय नेत्यांविरोधात कथित आक्षेपार्ह किंवा बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.







