कामगार नेते काशिनाथ नखाते यांची मागणी; अन्यथा बीएसएनएल व महापालिका कार्यालयावर आंदोलनाचा इशारा
काशिनाथ शिंदे
पिंपरी, निगडी प्राधिकरण परिसरातील बीएसएनएलच्या भूमिगत इन्स्पेक्शन डक्टमध्ये उतरलेल्या दोन तरुण कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बीएसएनएल अधिकारी, महानगरपालिका अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांवर तातडीने कडक कारवाई करावी. तसेच मृत कामगारांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपये अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निगडी प्राधिकरण परिसरातील बीएसएनएलच्या भूमिगत इन्स्पेक्शन डक्टमध्ये कामासाठी दोन तरुण कामगारांना उतरविण्यात आले होते. यावेळी मनोज बाबुराव शिंदे (वय २६) आणि अमोल अशोक शिंदे (वय २०) यांचा गुदमरून मृत्यू झाला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. भूमिगत डक्टमध्ये ऑक्सिजनची कमतरता, विषारी वायू किंवा अन्य कारणामुळे कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. मात्र, कामगारांना अशा धोकादायक ठिकाणी उतरविताना आवश्यक सुरक्षा साधने, ऑक्सिजनची व्यवस्था, मास्क आणि इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या का, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
विशेष म्हणजे, याच ठिकाणी वर्षभरापूर्वीही अशाच स्वरूपाची दुर्घटना घडली होती. १५ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या घटनेत लखन धावारे, दत्ता होणारे आणि साहेबराव गिरशेटे या तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतरही संबंधित यंत्रणांनी धोकादायक कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाय केले नसतील, तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे नखाते यांनी म्हटले आहे.
या पूर्वीच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने २० ऑगस्ट रोजी चिंचवड येथील बीएसएनएल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतरही पुन्हा त्याच परिसरात दोन कामगारांचा जीव गेल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून त्यांना धोकादायक भूमिगत डक्टमध्ये काम करण्यास लावणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांची चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये अर्थसहाय्य आणि कुटुंबातील एका व्यक्तीस रोजगार द्यावा, अशी मागणी नखाते यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास बीएसएनएल आणि महानगरपालिका कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.







