प्रत्येक तालुक्यात रोजगार मेळे आणि करिअर मार्गदर्शन उपक्रम राबविण्याची गरज
काशिनाथ शिंदे
पिंपरी, रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून तरुणांसाठी रोजगाराच्या संधींची दारे खुली होत असून, विद्यार्थ्यांना नोकरी आणि कंपन्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणारे रोजगार मेळे हे प्रभावी व्यासपीठ ठरत आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात तसेच सर्व राजकीय पक्षांनी रोजगार मेळे आणि करिअर मार्गदर्शन उपक्रम राबविण्याची गरज आहे, असे मत विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी व्यक्त केले.
पत्रकारांशी संवाद साधताना अहिर बोलत होते. श्रीरंग बारणे, विश्वजीत आणि विशेषतः सुलभा ताई यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेला रोजगार मेळा हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
अहिर म्हणाले, ‘‘रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत; मात्र त्या योग्य उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक व्यासपीठ अनेकदा मिळत नाही. त्यामुळे रोजगार मेळ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. केवळ नोकरीच्या शोधात असलेले तरुणच नव्हे, तर सध्या नोकरी करणारे युवकही चांगले पॅकेज, नवीन नोकरी किंवा पदोन्नतीच्या संधी शोधत असतात.’’
पात्र नसलेल्या उमेदवारांनाही जॉब कार्ड
रोजगार मेळ्याचे वैशिष्ट्य सांगताना अहिर म्हणाले, ‘‘सध्याच्या निकषांमध्ये पात्र न ठरणाऱ्या किंवा आज नोकरी न मिळालेल्या उमेदवारांनाही जॉब कार्ड देण्यात येत आहे. पुढील तीन महिन्यांत रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्यास संबंधित उमेदवारांना त्याची माहिती देऊन अर्ज करण्याची संधी दिली जाणार आहे. ही काळाची गरज आहे.’’
नोकरीसोबत करिअर मार्गदर्शनही आवश्यक
केवळ नोकरी मिळवून देणे हा रोजगार मेळ्याचा उद्देश न ठेवता विद्यार्थ्यांना करिअर काउन्सेलिंग आणि योग्य क्षेत्र निवडीबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. पदवी घेतल्यानंतर कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. श्रीकांतजी, बारणे साहेब आणि इतरांच्या सहकार्याने आगामी काळात रोजगार व करिअर मार्गदर्शन मेळा आयोजित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही अहिर यांनी सांगितले.
जरांगे यांच्या मागण्यांवर मार्ग निघेल
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत अहिर म्हणाले, ‘‘सरकारने यापूर्वी त्यांच्याशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतली आहे. शंभूराज देसाई, विखे पाटील यांच्यासह अन्य दूतही त्यांच्याकडे गेले होते. तरीही त्यांना पुन्हा उपोषणाला बसावे लागले आहे. सरकार त्यांच्या भावनांशी निश्चितच सहमत आहे. त्यांनी वेळोवेळी केलेल्या मागण्यांपैकी काही मागण्यांवर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणातही निश्चितपणे काहीतरी मार्ग निघेल.’’
मुंबई महापालिकेतील प्रतिनिधित्वावरून वाद नाही
मुंबई महापालिकेतील समित्यांमधील प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर अहिर म्हणाले, ‘‘हा वादाचा विषय नाही. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या भूमिकेनुसार काम करतो. प्रतिनिधित्व मिळावे, अशी एखाद्या पक्षाची मागणी असेल तर त्याला वाद म्हणता येणार नाही. परस्पर सहमतीने त्यावर मार्ग काढला जात आहे.’’
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेबाबत बोलताना संबंधित दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भूमिका अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक राजकीय पक्षाला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न होणे स्वाभाविक असल्याचे अहिर म्हणाले.
‘ईडी’च्या कारवाईकडे पूर्वग्रहाने पाहू नये
मल्लिकार्जुन खडगे यांच्या सभेनंतर करण्यात आलेल्या कथित शुद्धीकरणाच्या मुद्द्यावर अहिर यांनी हा जुना विषय असून, प्रशासनाने त्यावेळी स्पष्टीकरण दिले होते, असे सांगितले. संसदेतील चर्चेदरम्यानही सरकारकडून याबाबत उत्तर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
ईडीच्या कारवाईबाबत विचारले असता अहिर म्हणाले, ‘‘अलीकडे कोणकोणत्या कारवाया झाल्या, याची मला माहिती नाही. एखाद्या प्रकरणात गैरप्रकार आढळल्यास चौकशी होणे ही नियमित प्रक्रिया आहे. एखाद्या विकासकावर किंवा अन्य व्यक्तीवर कारवाई झाली असेल, तर ती चौकशीचा भाग आहे. त्याकडे पूर्वग्रहाने पाहणे योग्य नाही.’’
हिंदी भाषिकांना मराठी शिकविण्याची मोहीम सुरूच
हिंदी भाषिकांना मराठी शिकविण्याच्या मोहिमेबाबत अहिर म्हणाले, ‘‘आपल्या प्रयत्नांमुळे अनेक हिंदी भाषिक मराठी बोलू लागले आहेत, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. एक वर्षाची कालमर्यादा दिली आहे, याचा अर्थ मोहीम थांबणार असा नाही. परिवहन विभाग तसेच पक्षाच्या माध्यमातूनही मराठी शिकविण्याची मोहीम सुरूच राहणार आहे. एक वर्षाच्या कालावधीत प्रत्येक व्यक्तीला मराठी बोलता यावी, यासाठी आवश्यक पावले उचलली जातील







