काशिनाथ शिंदे
मावळ, पुणे : एकवीरा कार्ला गडावरील प्रस्तावित रोपवे प्रकल्पाला वेहरगाव-कार्ला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत सोमवारी आंदोलन केले. रोपवे प्रकल्प रद्द करावा, अर्धवट असलेला रस्ता तातडीने पूर्ण करावा, तसेच परिसरात पार्किंग, पाणी, स्वच्छतागृह आणि पोलिस चौकी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी केल्या.
या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी स्थानिक दुकाने बंद ठेवून पायी मोर्चा काढला. त्यानंतर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चक्का जाम आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.
‘रोपवे बीओटी पद्धतीने झाल्यास स्थानिकांच्या पारंपरिक व्यवसायावर गदा येईल’, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. कार्ला परिसरातील स्थानिक दुकानदार, व्यावसायिक आणि ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने रोपवे प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिले. प्रशासनाकडून मागण्यांची दखल घेतली जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.
मात्र, एकवीरा रोपवे प्रकल्पाच्या मुद्द्यावर ग्रामस्थांचा विरोध कायम असून, प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.







