— उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
सोमेश्वर साखर कारखान्यात शेतकरी मेळावा; कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक सिंचन, यांत्रिकीकरणाचा वापर वाढविण्याचे आवाहन
काशिनाथ शिंदे
पुणे, बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील अनिश्चितता या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादन खर्चात बचत आणि मूल्यवर्धित उत्पादनांवर भर देणे आवश्यक आहे. कृषी व साखर क्षेत्राने अचूक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या संधींचा स्वीकार करून शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, सोमेश्वरनगर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, आमदार सचिन पाटील, माजी आमदार संभाजी कुंजिर, पीडीसीसी बँक, पुणेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष किसन तांबे, माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, सभासद आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आधुनिक तंत्रज्ञानातून उत्पादन खर्चावर नियंत्रण
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. शेतकरी सक्षम झाला तर गावाची आणि पर्यायाने राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. त्यामुळे शासन, शेतकरी, सहकारी संस्था आणि साखर उद्योगाने समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
स्वर्गीय दादा हे स्वतः शेतकरी असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी आणि गरजांची जवळून जाण होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर सातत्याने भर दिला. आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक सिंचन पद्धती, यांत्रिकीकरण, माती परीक्षण, सुधारित वाणांची निवड आणि अचूक पीक नियोजन यांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. यामुळे उत्पादनक्षमता वाढण्याबरोबरच उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
साखर कारखान्यांनी साखरेपलीकडे पाहावे
महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा साखर उद्योग हा महत्त्वाचा कणा आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, हवामानातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि साखरेच्या बाजारपेठेतील चढ-उतार यांचा सामना करण्यासाठी साखर कारखान्यांनी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहता कामा नये.
इथेनॉल, बायोगॅस, सीएनजी, सेंद्रिय खत तसेच इतर मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीकडे कारखान्यांनी वळणे गरजेचे आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
सोमेश्वर कारखान्याच्या कामगिरीचे कौतुक
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आर्थिक शिस्त, कार्यक्षम व्यवस्थापन आणि शेतकरीहिताला प्राधान्य देत सहकार क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण केली आहे. कारखान्याच्या प्रगतीमध्ये सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी आणि व्यवस्थापनाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
आगामी काळात शेतकरी सभासदांना अधिकाधिक लाभ मिळेल, यासाठी कारखान्याने दीर्घकालीन नियोजन करावे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची परंपरा कायम ठेवत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकारी संस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आर्थिक बळकटी कायम ठेवण्याचे आवाहन
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी सोमेश्वर कारखान्याच्या प्रगतीचे कौतुक केले. शेतकरी, सभासद, कामगार आणि व्यवस्थापनाच्या योगदानातून संस्थेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. कारखान्याची आर्थिक बळकटी, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता कायम ठेवून भविष्यातील विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार सचिन पाटील यांनीही कारखान्याच्या कार्यक्षम व्यवस्थापनाचे, आर्थिक शिस्तीचे आणि शेतकरीहिताच्या कामकाजाचे कौतुक केले.
कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रास्ताविकात सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची आणि साधलेल्या कामगिरीची माहिती दिली.
शेतकरी मेळाव्यास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







