आयशर टेम्पोचा पाठलाग करून तिघांना बेड्या; २४ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त
काशिनाथ शिंदे : धाराशिव हायवेवर वाहन अडवून चालकाला मारहाण करून लुटमार करणाऱ्या टोळीचा धाराशिव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आयशर टेम्पोचा पाठलाग करत तिघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून आयशर टेम्पोसह इर्टिगा कार, सोन्याचे दागिने आणि लुटीतील इतर साहित्य असा एकूण २४ लाख ८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यांचा तपास करून चोरी व लुटमारीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते. दरम्यान, ६ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, काही आरोपी चोरीचे साहित्य आयशर टेम्पोमधून घेऊन जाणार आहेत.
माहितीच्या आधारे पोलिसांनी सोनईगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पहाटे सुमारे ५.५० वाजता आयशर टेम्पोचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलिसांच्या अंगावरच वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. प्रसंगावधान राखत पोलिसांनी वाहन बाजूला घेतले आणि त्यानंतर टेम्पोचा पाठलाग करून त्यातील व्यक्तीला ताब्यात घेतले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी आनंद उर्फ आकाश शामराव पवार (२७, रा. आळणी, जि. धाराशिव), बल्या उर्फ सोनू अशोक शिंदे (२३, रा. गोगलगाव, ता. भूम) आणि शंकर गणू काळे (२४, रा. जयभवानी नगर, ढोकी, जि. धाराशिव) या तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींकडून एमएच २४ बीडब्ल्यू ९५०६ क्रमांकाचा आयशर टेम्पो आणि सुमारे १७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील चौकशीत आरोपींनी धाराशिव ग्रामीण, शिराढोण तसेच नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या चोरीच्या गुन्ह्यांची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना जबरदस्तीने लुटलेला माल, इर्टिगा कार आणि सोन्याचे दागिने असा एकूण २४ लाख ८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने केली.
कारवाईमध्ये सपोनि अमोल मोरे, पोहेकॉ राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, चालक पोलीस केदार शेरखाने, विनायक दहीहंडे, प्रकाश बाईनवाड तसेच क्यूआरटी पथक सहभागी झाले होते.
धाराशिव पोलिसांच्या या कारवाईमुळे हायवेवर वाहनचालकांना अडवून लुटमारी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला असून, आरोपींकडून आणखी किती गुन्हे उघडकीस येतात, याकडे आता लक्ष लागले आहे.







