११ ते २६ सप्टेंबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम; प्रवाशांना तक्रारीसाठी संपर्क क्रमांक जाहीर
काशिनाथ शिंदे
पुणे: गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन खासगी प्रवासी बसमालकांकडून जादा भाडे आकारण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कंबर कसली आहे. प्रवाशांकडून जादा भाडे आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ११ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत खासगी प्रवासी बस व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी खासगी प्रवासी बसचालक व मालकांनी शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरांचे पालन करणे बंधनकारक आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या वाहनमालकांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संबंधित संवर्गातील सध्याच्या टप्पा वाहतूक भाडेदराचा विचार करून खासगी कंत्राटी परवाना वाहनाने संबंधित संवर्गाच्या बससाठी आकारण्यात येणाऱ्या भाड्यापेक्षा ५० टक्क्यांपेक्षा अधिक भाडे आकारता येणार नाही. तसेच एसटी महामंडळाच्या प्रवासी तिकिटाच्या दराच्या दीडपटपेक्षा अधिक भाडे आकारण्यास मनाई आहे.
खासगी बसमालक आणि चालकांनी आपल्या वाहनाची सर्व आवश्यक कागदपत्रे वैध व अद्ययावत असल्याची खात्री करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.
जादा भाडे आकारल्यास थेट आरटीओकडे तक्रार
प्रवासादरम्यान खासगी बसकडून जादा भाडे आकारले जात असल्यास किंवा प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन आरटीओने केले आहे. तक्रार करताना प्रवाशांनी नाव, भ्रमणध्वनी क्रमांक आणि तिकिटाचे छायाचित्र देणे आवश्यक आहे.
प्रवाशांनी ८२७५३३०१०१ या संपर्क क्रमांकावर अथवा mh12prosecution.rtopune@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.






