सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्याची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा ठाम संदेश
काशिनाथ शिंदे
पुणे: सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. मातृत्वाचा प्रवास प्रत्येक महिलेने भीतीतून नव्हे, तर विश्वासातून करावा. वैद्यकीय उपचारांसोबत माया, आधार, सुरक्षितता आणि सन्मान मिळणेही तितकेच आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘माहेरवाशीण – मातृत्व सेवेची नवी संकल्पना’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ लवळे, मुळशी येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या परिसरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार शंकर मांडेकऱ, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. आर. रमण, प्रवोस्ट तथा वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रमुख डॉ. राजीव येरवडेकर, सिंबायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. (डॉ.) शां. ब. मुजुमदार आदी उपस्थित होते.
‘माहेर’ म्हणजे माया, आधार आणि सुरक्षिततेचा विश्वास
आपल्या संस्कृतीत ‘माहेर’ म्हणजे माया, आधार, सुरक्षितता, काळजी आणि ‘तू एकटी नाहीस’ हा विश्वास आहे. गर्भावस्थेपासून प्रसूतीनंतरच्या काळापर्यंत महिलेला वैद्यकीय उपचारांसोबत भावनिक सुरक्षितता, पोषण, विश्रांती, कुटुंबाचा आधार, सन्मान आणि आपलेपणाची गरज असते. या सर्व बाबी एकत्र आणणारी ‘माहेरवाशीण’ ही संकल्पना आहे. प्रत्येक मातेसाठी रुग्णालय हेच तिचे मातृगृह ठरावे, हा या उपक्रमामागील विचार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
निरोगी माता म्हणजे निरोगी कुटुंब आणि निरोगी कुटुंब म्हणजे सक्षम महाराष्ट्र, असे सांगत त्यांनी महिला व बालकांच्या आरोग्याकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांपर्यंत मातृत्वविषयक आरोग्यसेवा प्रभावीपणे पोहोचविण्यात आशा कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
आशा कार्यकर्त्या होणार ‘माहेर-दूत’
‘माहेरवाशीण’ उपक्रमांतर्गत आशा कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना ‘माहेर-दूत’ म्हणून सक्षम करण्याची संकल्पना आहे. त्यामुळे गर्भवती महिलांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि वेळेवर आरोग्यसेवेशी जोडण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या ‘कुटुंब दत्तक योजना’सारख्या समुदायाभिमुख उपक्रमांशी ‘माहेरवाशीण’ची सांगड घातल्यास भावी डॉक्टरांना महिलेकडे केवळ वैद्यकीय प्रकरण म्हणून नव्हे, तर एक व्यक्ती, कुटुंब आणि सामाजिक वास्तव म्हणून पाहण्याची दृष्टी मिळेल, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
बारामतीच्या महिला रुग्णालयाचा अनुभव घेण्याचे आवाहन
महिलांच्या मातृत्व सेवेबाबत बारामतीतील महिला रुग्णालयाच्या कार्याचा संदर्भ देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, २०१५ मध्ये बारामतीतील महिला रुग्णालयातून या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. बारामतीसह कर्जत-जामखेड, फलटण, अकलूज, इंदापूर, पुरंदर आणि हडपसर परिसरातील गर्भवती मातांची तपासणी, सुरक्षित प्रसूती तसेच माता-बाळाची माहेरासारखी काळजी या रुग्णालयातून घेतली जाते.
या रुग्णालयात रुग्णांना ॲम्बुलन्ससह नाश्ता आणि दोन्ही वेळचे जेवण विनामूल्य दिले जाते. शंभर खाटांच्या या महिला रुग्णालयात दरमहा सुमारे ४०० प्रसूती होत असून, आतापर्यंत ४९ हजार ७७० सुखरूप प्रसूती झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी या रुग्णालयाचा गौरव झाला आहे.
सिंबायोसिसच्या पथकाने बारामतीतील महिला रुग्णालयाला भेट देऊन तेथील कार्यपद्धतीची माहिती घ्यावी. या अनुभवातून ‘माहेरवाशीण’ उपक्रमाला निश्चितच दिशा मिळेल, अशी सूचनाही त्यांनी केली.
९०० खाटांच्या रुग्णालयात सेवा विनामूल्य
सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय आणि सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्राच्या ९०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात ‘माहेरवाशीण’ सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणतीही माता सुरक्षित आणि दर्जेदार मातृत्व सेवेपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
चार आधारस्तंभांवर उभारली संकल्पना
‘माहेरवाशीण’ उपक्रमाची संकल्पना डॉ. राजीव येरवडेकर यांनी मांडली आहे. प्रसूतीसाठी रुग्णालयात येणाऱ्या महिलेकडे केवळ ‘रुग्ण’ म्हणून न पाहता माहेरी आलेली मुलगी म्हणून सन्मानाने, आपुलकीने आणि संवेदनशीलतेने पाहणे, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे.
‘माहेर अनुभव, माहेर पोषण, माहेर संस्कृती आणि माहेर बाळंतपणोत्तर काळजी’ या चार प्रमुख आधारस्तंभांवर हा उपक्रम आधारित आहे. प्रसूतीपूर्व व प्रसूतीदरम्यान आश्वासक वातावरण, संवेदनशील परिचर्या, पसंतीच्या व्यक्तीची साथ, पौष्टिक आहार, सांस्कृतिक परंपरांचा सन्मान, स्तनपान व नवजात बालकाची काळजी तसेच प्रसूतीनंतरच्या मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन अशा विविध माध्यमातून मातेची सर्वांगीण काळजी घेतली जाणार आहे.
यावेळी मातृत्व आणि बाल आरोग्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या आरोग्यसेवकांचा तसेच ‘माहेरवाशीण’ उपक्रमाच्या लाभार्थी मातांचा सत्कार करण्यात आला. गर्भवती मातांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘माहेरवाशीण’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.






