इरादापत्रांसह जुने वाहन बदलून नवीन वाहन घेण्याचीही संधी; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा
काशिनाथ शिंदे
पुणे: परवाना बंदीमुळे रखडलेल्या ऑटोरिक्षा परवान्यांना तसेच नवीन वाहन नोंदणीच्या प्रक्रियेला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मोठा दिलासा दिला आहे. पूर्वी जारी करण्यात आलेल्या इरादापत्रांना नवीन ऑटोरिक्षा वाहन नोंदणीसाठी एकदाच १८० दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुदत संपल्याने अडचणीत आलेल्या अनेक अर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ज्या इरादापत्रांची १८० दिवसांची मुदत १ जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यानंतर संपली आहे, तसेच संबंधित अर्जदारांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी मुदतवाढीसाठी अर्ज केला आहे, अशा इरादापत्रांना एकदाच १८० दिवसांची मुदतवाढ मिळणार आहे.
तसेच, ९ मार्च २०२६ पर्यंत नवीन ऑटोरिक्षा नोंदणीसाठी अर्ज सादर केलेले, मात्र अद्याप नोंदणी क्रमांक जारी न झालेले इरादापत्रधारकांनाही १८० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधितांना वाहन नोंदणीसाठी सादर करता येणार आहे.
जुने वाहन बदलून नवीन घेण्यासही मुदतवाढ
परवानाधारकांना जुने ऑटोरिक्षा वाहन बदलून नवीन वाहन घेण्याच्या प्रक्रियेतही प्राधिकरणाने दिलासा दिला आहे. ३० जून २०२६ पर्यंत रिप्लेसमेंटची मुदत संपलेल्या प्रकरणांमध्ये, आवश्यक दंड भरून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत बदललेले वाहन सादर करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
दरम्यान, १ जुलै २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रिप्लेसमेंटची मुदत संपलेल्या प्रकरणांमध्ये कोणताही दंड न आकारता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाहन बदलाची नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे.
मात्र, निर्धारित मुदतीत वाहन बदलाची प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित परवाना रद्द समजण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सप्टेंबरनंतरच्या प्रकरणांसाठीही नियम स्पष्ट
१ सप्टेंबर २०२६ नंतर रिप्लेसमेंट झालेल्या प्रकरणांमध्ये वाहन बदलासाठी सहा महिन्यांची मुदत राहणार आहे. ही मुदत संपल्यानंतर संबंधित परवानाधारकाला केवळ एकदाच आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ वाहन बदलासाठी देण्यात येणार आहे.
ऑटोरिक्षा परवानाधारक आणि नवीन वाहन नोंदणीच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांनी या मुदतींची नोंद घेऊन निर्धारित कालावधीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांनी कळविले आहे.






