केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोगोचे अनावरण; सुरक्षित व तंत्रज्ञानाधारित वाहतुकीचा संकल्प
काशिनाथ शिंदे
पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) स्थापनेची ६० वर्षे पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून, २०२६-२७ हे वर्ष हीरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन जयराम गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे या हीरक महोत्सवी वर्षाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. यावेळी महोत्सवी वर्षाच्या विशेष लोगोचे अनावरण करण्यात आले.
‘सुरक्षित आणि संरक्षित वाहतूक सुनिश्चित करणे’ ही संकल्पना या लोगोमधून अधोरेखित करण्यात आली आहे. रस्ता सुरक्षा, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, तांत्रिक नवकल्पना आणि भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन अत्याधुनिक उपाययोजनांवर सीआयआरटीचा विशेष भर राहणार आहे.
सीआयआरटीचे संचालक डॉ. देवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. पुणे येथील सीआयआरटीमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या हीरक महोत्सवी वर्षाच्या मुख्य कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी गडकरी यांना निमंत्रित करण्यात आले. यावेळी त्यांना औपचारिक निमंत्रणपत्र तसेच विशेष निमंत्रणिका प्रदान करण्यात आली.
या शिष्टमंडळात सीआयआरटीचे संचालक डॉ. देवेंद्र सिंह, तांत्रिक सचिवालयाचे प्रमुख शेखर ढोले, वाहन सायबर सुरक्षेचे प्रमुख फारुख मखदूम तसेच संशोधन व सल्लागार सेवेचे प्रमुख उमेश सूर्यवंशी यांचा समावेश होता.
हीरक महोत्सवी वर्षभरात पुण्यात भव्य उद्घाटन सोहळ्यासह विविध राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक, संशोधन, जनजागृती आणि कौशल्यविकास कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. वाहनांमधील परस्पर संवाद तंत्रज्ञानावर राष्ट्रीय कार्यशाळा व तंत्रज्ञान प्रदर्शन, वाहन सायबर सुरक्षा चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन तसेच वाहन उत्पादक, बस बांधणी करणारे आणि विद्युत वाहन उत्पादकांसाठी चाचणी व प्रमाणन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.
विद्यार्थी आणि नवोदित व्यावसायिकांसाठी वाहन सायबर सुरक्षा कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असून, जोडलेली वाहतूक व्यवस्था, सायबर सुरक्षा, वाहन नोंदणी व योग्यता, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वयंचलित वाहन चाचणी यंत्रणांवर राष्ट्रीय कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे.
याशिवाय धोरणकर्ते, तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागातून ज्ञानमालिका व ध्वनिमुद्रित चर्चासत्रे, प्रवासी सुरक्षेबाबत राष्ट्रीय जनजागृती मोहीम आणि रस्ता सुरक्षा महिन्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सीआयआरटीच्या सहा दशकांच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे.
हीरक महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन सोहळ्यात सीआयआरटीचे आगामी दृष्टी, ध्येय आणि पुढील दहा वर्षांचा धोरणात्मक आराखडा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यातून भारतातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, संरक्षित, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत करण्याच्या दिशेने संस्थेची भविष्यातील भूमिका स्पष्ट होणार आहे.
सन १९६७ पासून सीआयआरटीने भारताच्या रस्ते वाहतूक क्षेत्रात वाहन चाचणी, प्रमाणन, संशोधन, सल्लागार सेवा आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. वाहन व सुट्या भागांच्या प्रमाणनापासून ते रस्ते वाहतूक क्षेत्रातील तांत्रिक क्षमता वाढविण्यापर्यंत सीआयआरटीने देशाच्या वाहतूक व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा प्रारंभ हा केवळ सहा दशकांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव नसून, भारतासाठी अधिक सुरक्षित, संरक्षित, आधुनिक, तंत्रज्ञानसक्षम आणि शाश्वत रस्ते वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या नव्या संकल्पाचा प्रारंभ असल्याचे या निमित्ताने अधोरेखित करण्यात आले






