काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : वाहनचालकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासोबतच सुरक्षित वाहनचालना आणि वाहतूक शिस्तीचा संदेश देण्यासाठी ड्रायव्हर डे उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी वाहतूक सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद वरखडे यांच्या सहभागाने झालेल्या या कार्यक्रमात वेदांत मोटर ड्रायव्हिंग स्कूल, समीर मोटर ड्रायव्हिंग स्कूल तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचा सहभाग होता.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक अभिजीत कांडगे, अभिजीत तरकसे आणि सहायक मोटार वाहन निरीक्षक शिवदीनी लाड यांनी उपस्थित वाहनचालकांना मार्गदर्शन केले. वाहनांची दैनंदिन देखभाल करणे, सुरक्षित वाहन चालविणे, अतिवेग टाळणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जबाबदारीने वाहनचालना करणे, याबाबत सूचना देण्यात आल्या.
विनोद वरखडे यांनी वाहनचालकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करताना, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःसह प्रवासी आणि इतर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. वाहनचालकांच्या अडचणी आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, वेगावर नियंत्रण ठेवणे तसेच रस्त्यावरील इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
“सुरक्षित चालक – सुरक्षित प्रवास – सुरक्षित समाज” हा संदेश देत वाहनचालकांचा सन्मान करण्यात आला. वाहनचालक हे वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक असून, त्यांची जबाबदार आणि शिस्तबद्ध वाहनचालना अपघातांचे प्रमाण कमी करण्यास महत्त्वपूर्ण ठरू शकते, असे अभिजीत कांडगे यांनी सांगितले.
कार्यक्रमास पीएमपीएमएल डेपो व्यवस्थापक प्रताप चव्हाण, राष्ट्रवादी वाहतूक सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद वरखडे, अकबर शेख, तहल मातव यांच्यासह विविध पदाधिकारी आणि वाहनचालक उपस्थित होते.






