वाल्हेकरवाडीतील उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पोलीस उपनिरीक्षक निखिल वाघोले यांचे आवाहन
काशिनाथ शिंदे
पिंपरी, : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे सेवन आणि विविध प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहावे. गणेश मंडळे, युवक आणि नागरिकांनी सुरक्षित व जबाबदार गणेशोत्सवासाठी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक निखिल वाघोले यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाल्हेकरवाडी येथे ‘लोकसंवाद’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच सायबर सुरक्षा, अमली पदार्थ आणि व्यसनमुक्तीबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक निखिल वाघोले, चिंतामणी मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश आहेर, निशिगंधा गणेश मंडळाचे अध्यक्ष शंकरराव सावंत, मंडळांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
सायबर फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी अनोळखी लिंक, क्यूआर संकेतांक, मोबाईल अनुप्रयोग किंवा संशयास्पद संदेशांवर विश्वास ठेवू नये. एकदाच वापरला जाणारा संकेतांक, एटीएम गुप्त क्रमांक, सीव्हीव्ही, संकेतशब्द तसेच बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे वाघोले यांनी सांगितले.
सामाजिक माध्यमांवरील आकर्षक ऑफर, बनावट सरकारी अधिकारी किंवा पोलीस अधिकारी म्हणून येणारे दूरध्वनी तसेच ‘डिजिटल अटक’ यांसारख्या फसवणुकीच्या प्रकारांपासून नागरिकांनी सतर्क राहावे. सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
अमली पदार्थांना ठाम नकार द्या
गणेशोत्सवाच्या काळात युवकांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. अमली पदार्थांचे सेवन आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि कौटुंबिक जीवनावर गंभीर परिणाम करू शकते. त्यामुळे ‘एकदा करून पाहू’ या मानसिकतेपासून दूर राहून अमली पदार्थांना ठामपणे नकार द्यावा.
व्यसनाधीन व्यक्तीला हिणवण्याऐवजी त्याला समुपदेशन आणि उपचारासाठी मदत करावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले.
गणेश मंडळांनीही जनजागृती करावी
गणेश मंडळांनी मंडप परिसरात ‘सायबर सुरक्षा’, ‘अमली पदार्थांना नकार’ आणि ‘व्यसनमुक्त समाज’ याबाबत जनजागृतीपर फलक, संदेश आणि विविध उपक्रम राबवावेत. उत्सवाच्या काळात अफवा, अप्रमाणित संदेश किंवा आक्षेपार्ह माहिती सामाजिक माध्यमांवर प्रसारित करू नये.
संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास स्वतःहून कारवाई न करता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले.
‘उत्सव गणरायाचा… संकल्प सुरक्षित समाजाचा!’ या भावनेतून नागरिकांनी सायबर सुरक्षितता, व्यसनमुक्ती आणि कायदा-सुव्यवस्थेला सहकार्य करून शांततामय व सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक निखिल वाघोले यांनी केले.
गणेशोत्सवाच्या कालावधीत ‘लोकसंवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे माहिती अधिकारी गणेश फुंदे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन उपसंपादक संदीप राठोड, जितेंद्र खंडागळे आणि विशाल तामचीकर यांनी केले.







