‘लोकसंवाद २०२६’मधून गणेशोत्सवात रक्तदानाबाबत जनजागृती; डॉ. विद्या राठोड यांचे आवाहन
काशिनाथ शिंदे
पुणे : रक्तदान हे केवळ गरजू रुग्णाला जीवदान देणारे श्रेष्ठ दान नसून, रक्तदात्याच्या आरोग्यासाठीही त्याचे अनेक फायदे आहेत. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना मदत मिळू शकते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन रक्तपेढीच्या डॉ. विद्या राठोड यांनी केले.
माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद २०२६’ या उपक्रमांतर्गत येरवडा येथील माजी सैनिक नगरमधील श्री अष्टविनायक मित्र मंडळात रक्तदानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉ. विद्या राठोड यांनी रक्तदानाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यविषयक फायदे नागरिकांना समजावून सांगितले.
डॉ. राठोड म्हणाल्या की, शरीरातील लोहाचे प्रमाण वाढल्यास काही आरोग्यविषयक धोके वाढू शकतात. नियमित रक्तदानामुळे शरीरातील अतिरिक्त लोह कमी होण्यास मदत होते. रक्तदानानंतर शरीर गमावलेले रक्त भरून काढण्यासाठी तत्काळ कार्यरत होते. त्यामुळे अस्थिमज्जेला चालना मिळून नवीन लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत होते.
रक्तदान करण्यापूर्वी दात्याची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये हिमोग्लोबिन, रक्तदाब, नाडीचा वेग आणि वजन यांची तपासणी केली जाते. तसेच रक्ताची एचआयव्ही, हिपॅटायटीस आणि मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांसाठी तपासणी केली जाते. त्यामुळे रक्तदानाच्या प्रक्रियेत दात्याच्या आरोग्याची प्राथमिक माहितीही मिळते.
रक्तदानाचे सामाजिक आणि आरोग्यविषयक महत्त्व लक्षात घेता नागरिकांनी गैरसमज दूर करून रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. विद्या राठोड यांनी केले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष ओमकार ढाणे, उपाध्यक्ष ओमकार नायर, कार्याध्यक्ष पियुष गायचोर यांच्यासह मंडळाचे इतर पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.







