फॅन्सी नंबरप्लेट, काळ्या काचा अन् नियमबाह्य सायलेन्सरविरोधात धडक कारवाई; १७ दिवसांत ८,९१२ वाहनांवर कारवाई
काशिनाथ शिंदे
पिंपरी : वाहनांवर काळ्या काचा, फॅन्सी नंबरप्लेट तसेच नियमबाह्य सायलेन्सर लावून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पिंपरी वाहतूक विभागाने धडक कारवाई केली आहे. अमित डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या कारवाईत १ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत तब्बल ८ हजार ९१२ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, ८६ लाख ६७ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पिंपरी वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, काळ्या काचा असलेल्या २ हजार ६१५ वाहनांवर कारवाई करून ३३ लाख ५ हजार रुपये, नियमबाह्य सायलेन्सर असलेल्या १ हजार ४७९ वाहनांवर कारवाई करून १४ लाख ७८ हजार रुपये, तर फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या ४ हजार ८१८ वाहनांवर कारवाई करून ३८ लाख ८४ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
आमदाराचा लोगो लावून फिरणाऱ्यांनाही दणका
पिंपरी वाहतूक विभागाच्या हद्दीत आमदाराचा लोगो (स्टिकर) लावून आपण महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असल्याचे भासविणाऱ्या वाहनचालकांविरोधातही अमित डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे आमदार किंवा खासदार सदस्य असल्याचे दर्शविणारे लोगो वाहनावर लावून फिरणाऱ्यांविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१३ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ७४९/२०२६ आणि १५ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ७६९/२०२६ दाखल करण्यात आल्याचे पत्रकात नमूद आहे.
बेजबाबदार वाहनचालकांवरही कारवाई
१३ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज ते जिजाऊ चौक, संत तुकारामनगर, पिंपरी या मार्गावर भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविण्याचा प्रकार समोर आला. स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालविल्याप्रकरणी संबंधित वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाहनांवर अनधिकृत स्टिकर, फॅन्सी नंबरप्लेट, काळ्या काचा किंवा नियमबाह्य सायलेन्सर वापरून वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे अमित डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.







