काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच उर्दू माध्यमातील विद्यार्थी व शिक्षकांच्या शैक्षणिक प्रश्नांसाठी सातत्याने योगदान देणारे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उर्दू माध्यमिक विद्यालय, रुपीनगर येथील शिक्षक अशफाक शेख यांना अहद फाउंडेशनतर्फे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
अहद फाउंडेशनचे संस्थापक मजहर मणियार आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, माजी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी तथा आयजीपी अब्दुल रहमान यांच्या हस्ते अशफाक शेख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी नगरसेविका आसीया मणियार, नगरसेवक प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते मोहनदादा जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक रफिक शेख, सामाजिक कार्यकर्ते मोहसीन भाई शेख, झाहिद भाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अशफाक शेख हे रुपीनगर येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उर्दू माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी योगदान देतानाच ते पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातील उर्दू माध्यमातील विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध शैक्षणिक प्रश्नांसाठी सक्रियपणे कार्यरत आहेत.
उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून देणे, त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करणे, शिक्षकांच्या अडचणी व शैक्षणिक प्रश्न प्रशासनासमोर मांडणे तसेच उर्दू शिक्षणाच्या विकासासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेणे, या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे.
रुपीनगर येथील उर्दू माध्यमिक विद्यालयाला यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे ‘सर्वोत्कृष्ट माध्यमिक विद्यालय’ हा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीसह विविध उपक्रमांमध्ये अशफाक शेख यांचेही विशेष योगदान राहिले आहे.
याच कार्यक्रमात उर्दू माध्यमिक विद्यालय, रुपीनगरच्या मुख्याध्यापिका सौ. टिळेकर एम. एन. यांनाही सन्मानित करण्यात आले.
अहद फाउंडेशनतर्फे मिळालेल्या या सन्मानाबद्दल अशफाक शेख यांचे शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
“उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि अधिकाधिक शैक्षणिक संधी मिळाव्यात, यासाठी यापुढेही प्रामाणिकपणे कार्य करत राहणार,” अशी भावना अशफाक शेख यांनी व्यक्त केली.






