ताथवडे रोडवरील ४० बाय ३० फुटांचा फलक लोखंडी सांगाड्यासह हटविला; जाहिरात एजन्सींना आयुक्तालयाचा इशारा
काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासह महापालिकेचा महसूल वाढविण्याच्या उद्देशाने अनधिकृत जाहिरात फलकांची स्थळ पाहणी करून ते तातडीने निष्कासित करण्यात येत आहेत. मंगळवारी (दि. २२) ताथवडे रोड, विष्णूदेव नगर, पुनावळे परिसरातील तब्बल ४० बाय ३० आकाराचा अनधिकृत जाहिरात फलक लोखंडी सांगाड्यासह हटविण्यात आला.
महापालिका हद्दीत खासगी जागेवर जाहिरात फलक उभारण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील नियम २४४ व २४५ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका (आकाशचिन्ह व स्कायसाईन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन व नियंत्रण नियम २०२२ मधील तरतुदींनुसार ही परवानगी आवश्यक आहे.
पिंपरी-चिंचवड हे देशातील प्रमुख औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. शहराचा नियोजनबद्ध विकास होत असताना शहराचे सौंदर्य आणि स्वच्छता अबाधित ठेवण्यावर महापालिकेचा भर आहे. मात्र, महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता उभारण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांमुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत असून महापालिकेच्या महसुलाचेही नुकसान होत आहे.
या पार्श्वभूमीवर आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील महिन्यात ताथवडे परिसरातील अनधिकृत जाहिरात फलक, थरमॅक्स चौकातील फलक, समर्थ सहकारी बँकेच्या इमारतीवरील फलक तसेच सर्व्हे क्रमांक १७५/९, काळीभित रोड, चोवीसावाडी येथील अनधिकृत जाहिरात फलक निष्कासित करण्यात आले आहेत.
ताथवडे रोड, विष्णूदेव नगर, पुनावळे येथे अनधिकृतपणे ४० बाय ३० आकाराचा जाहिरात फलक उभारण्यात आल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. त्यानंतर उपआयुक्त (परवाना) राजेश आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या पथकाने मंगळवारी कारवाई करत हा जाहिरात फलक लोखंडी सांगाड्यासह हटविला.
अनधिकृत फलक उभारल्यास तातडीने कारवाई
महापालिका हद्दीतील सर्व जाहिरात एजन्सींनी यापुढे अनधिकृत जाहिरात फलक उभारू नयेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे. पूर्वपरवानगी न घेता जाहिरात फलक उभारल्याचे आढळून आल्यास संबंधित फलक महापालिकेकडून तातडीने निष्कासित करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
महापालिकेच्या परवानगीशिवाय जाहिरात फलक उभारणाऱ्या जाहिरात एजन्सींनी याची गंभीर नोंद घ्यावी, असे उपआयुक्त राजेश आगळे यांनी स्पष्ट केले आहे.







