घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो-व्हिडिओ Bappa.org वर अपलोड करण्याचे आवाहन; नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांची नागरिकांना साद
काशिनाथ शिंदे
पिंपरी : महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून दर्जा दिला आहे. महाराष्ट्राच्या या समृद्ध परंपरेला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी तसेच गणेशोत्सवाला युनेस्कोसह अन्य जागतिक मानांकने मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जनता संपर्क अधिकारी तथा नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशाने या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रफुल्ल पुराणिक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सवाशी संबंधित प्रसिद्धी उपक्रम राबविणे, त्यांचा समन्वय साधणे आणि शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या कला, परंपरा, लोकजीवन, सामाजिक एकोपा, हस्तकला, उद्यमशीलता आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारी व्यापक लोकचळवळ आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचे दस्तऐवजीकरण करून त्याची ओळख राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविणे आवश्यक असल्याचे पुराणिक यांनी सांगितले.
या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्राची कला, संस्कृती, परंपरा, ज्ञान, लोकजीवन, हस्तकला, उद्यमशीलता आणि सांस्कृतिक प्रभाव जगभर पोहोचविण्यात येणार आहे. यासाठी समाजातील लहान-थोरांसह सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
नागरिकांच्या सहभागातून जतन होणार गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा
महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या परंपरा, कला, चालीरीती आणि सांस्कृतिक वारशाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुरातत्त्व संचालनालयामार्फत Bappa.org हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या अधिकृत मंचावर महाराष्ट्रासह देशभरातील तसेच ३५ हून अधिक जागतिक शहरांमधील गणेशोत्सवाशी संबंधित घरगुती व सार्वजनिक परंपरा, गणेशमूर्ती स्थापना, सजावट, हस्तकला, चालीरीती, कला सादरीकरण, खाद्यपरंपरा, आठवणी, छायाचित्रे आणि व्हिडिओ नागरिकांना नोंदविता व अपलोड करता येणार आहेत.
नागरिकांच्या सहभागातून तयार होणारा हा दस्तऐवज महाराष्ट्राच्या गणेशपरंपरेचा अधिकृत आणि कायमस्वरूपी सांस्कृतिक ठेवा म्हणून जतन केला जाणार आहे.
गणेश मंडळे, कलाकार, संस्था आणि नागरिकांनी सहभागी व्हावे
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही मोहीम व्यापक लोकचळवळ बनविण्यासाठी प्रत्यक्ष तसेच डिजिटल माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
शहरातील नागरिक, गणेश मंडळे, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, कलाकार, शैक्षणिक संस्था तसेच विविध सामाजिक घटकांनी आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित परंपरा, कला, छायाचित्रे, व्हिडिओ आणि आठवणी Bappa.org वर अपलोड कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी, हिंदी, इंग्रजीसह नागरिकांना सोयीच्या विविध भाषांमध्ये माहिती नोंदविता येणार असून, पिंपरी-चिंचवडच्या गणेशोत्सवाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले आहे.







