सात दिवस साहित्य, नाट्य, संगीत, लोककला अन् वैचारिक कार्यक्रमांची मेजवानी
काशिनाथ शिंदे
पिंपरी: मराठी भाषेला लाभलेला अभिजात भाषेचा दर्जा आणि तिची समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक परंपरा जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ३ ऑक्टोबर रोजी ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ आणि ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात साहित्यिक चर्चा, परिसंवाद, कविसंमेलन, कथाकथन, अभिवाचन यांसह नाटक, संगीत, एकांकिका, लोककला, लावणी आणि गझल अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘गाणी मंगेशकरांची’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांनी या सप्ताहातील विविध कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी भाषा संवर्धनाच्या लोकचळवळीला बळ द्यावे, असे आवाहन केले आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, सांगवी येथील नटसम्राट निळूफुले नाट्यगृह, चिखली टाऊन हॉल आणि आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे विविध कार्यक्रम होणार असून, हे सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य असणार आहेत.
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सनई, हलगी, संबळ आदी पारंपरिक वाद्यांच्या निनादात सप्ताहाचा शुभारंभ होईल. त्यानंतर वैशाली पळसुले आणि सहकाऱ्यांचा ‘गणेश वंदना, कथक व लावणीची जुगलबंदी’, मोरया थिएटर्सचा ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’, दुपारी ३ वाजता पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सन्मान, सायंकाळी ४ वाजता ‘गाणी मंगेशकरांची’ आणि रात्री ९ वाजता अशोक हांडे प्रस्तुत ‘मंगलगाणी दंगलगाणी’ हे कार्यक्रम होतील.
रविवार, ४ ऑक्टोबर रोजी ‘भिरभिर’, ‘इन द नेम ऑफ’, संकर्षण कऱ्हाडे अभिनीत ‘नियम व अटी लागू’, ‘धरित्रीच्या लेकी’ आणि ‘द फोक महाराष्ट्र – ओळख माझ्या महाराष्ट्राची’ हे कार्यक्रम होतील.
सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी ‘नंतर कधीतरी’, ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’, सचिन खेडेकर अभिनीत ‘भूमिका’ आणि ‘सणयात्रा’ हे कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी ‘सोळाशे पन्नास’, ‘कॉर्पोरेट कबुतर’, ‘ऑल द बेस्ट’, ‘वरवरचे वधूवर’ आणि ‘सूर वेली’ हे कार्यक्रम सादर केले जातील.
बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी ६५ कलाकार व २५ नृत्यांगनांच्या सहभागातून ‘फोक लावणी’ हा विशेष कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाला केवळ महिलांना प्रवेश असेल. त्यानंतर भाऊ कदम अभिनीत ‘पहिली लग्नाची दुसरी प्रेमाची’ आणि ‘स्वर मराठी मनाचा’ हे कार्यक्रम होतील.
गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘चार्ली – चॅपलिन आणि जादूचा कंठमणी’, ‘गझल आख्यान’, ‘चांगभलं – व्हॉईस ऑफ दख्खन’, कवी वैभव जोशी यांचा ‘द मनमौजी’ आणि ‘म…मराठीचा’ हे कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी ‘मुक्ताक्षरे’, डॉ. गणेश शिंदे व सन्मिता धापटे-शिंदे यांचा ‘मोगरा फुलला’, बक्षीस वितरण व समारोप समारंभ, निमंत्रितांचे कविसंमेलन आणि ‘अविनाश – विश्वजित संगीत रजनी’ या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
माध्यम प्रतिनिधींच्या छायाचित्रांचे विशेष प्रदर्शन
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त माध्यम प्रतिनिधींनी टिपलेल्या निवडक छायाचित्रांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सार्वजनिक घडामोडींचे माध्यम प्रतिनिधींनी केलेले चित्ररूप दस्तऐवजीकरण या प्रदर्शनातून पाहता येणार आहे. ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कला दालनात हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
चिखली टाऊन हॉल
५ ऑक्टोबर रोजी सकाळी ‘ग्रीझीच्या गुहेत चिंटूची धमाल’ हे बालनाट्य आणि सायंकाळी ज्ञानेश्वर मेश्राम, कल्याणी देशपांडे व सहकाऱ्यांचा ‘अभंगवारी’ हा कार्यक्रम होणार आहे.
नटसम्राट निळूफुले नाट्यगृह, सांगवी
सांगवी येथे ५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान ‘अंतर्नाद’, ‘रंग भक्तीचे.. सूर लोकगीताचे’, ‘चार्ली – चॅपलिन आणि जादूचा कंठमणी’, ‘सदाबहार अजय-अतुल’, ‘स्वर-शांता’, ‘लावण्यरंग’, ‘गझलभाव’, ‘लग्नपंचमी’, ‘कथा वंगभंगाची’, ‘सूर तरुणाईचा.. ध्यास मराठीचा’ आणि ‘भ्रमाचा भोपळा’ आदी कार्यक्रम होणार आहेत.
७ ऑक्टोबर रोजी दुपारी ‘लावण्यरंग’ हा विशेष लावणी कार्यक्रम होणार असून, त्यासाठी केवळ महिलांना प्रवेश असेल.
आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी
५ ऑक्टोबर रोजी अभिवाचन, ‘अभिजात मराठी भाषेचा प्रवास’ या विषयावरील परिसंवाद, कथाकथन, गझल मुशायरा आणि गझलगायन होणार आहे.
६ ऑक्टोबर रोजी बालगीतांचा कार्यक्रम, बालनाट्य, बाबूजी ते अजय-अतुल या सांगीतिक प्रवासावर आधारित कार्यक्रम आणि ‘कवन – अक्षर अक्षर तुझेच आहे’ ही कवितांची मैफिल रंगणार आहे.
७ ऑक्टोबर रोजी स्थानिक कवींचे कविसंमेलन, ‘गंध मराठी कलेचा’, ‘मराठी साहित्याचे विश्व’ या विषयावरील चर्चासत्र आणि शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे.
ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी
७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून महापालिका शाळांअंतर्गत समूह नृत्य स्पर्धा होणार आहे. सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध लोकगायक नंदेश विठ्ठल उमप यांचा ‘मी मराठी’ हा भव्य लोककला सोहळा सादर होणार आहे.
“अभिजात मराठीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक”
“मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळणे हा महाराष्ट्राच्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव आहे. हा गौरव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता त्यामागची साहित्यिक परंपरा, लोककला, संगीत, नाट्य आणि सांस्कृतिक वैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. याच उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या मायबोलीच्या अभिजात वैभवाचा उत्सव साजरा करावा.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
“नागरी सहभागातून मराठीचा प्रचार-प्रसार अधिक दृढ होईल”
“मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महापालिका वर्षभर विविध उपक्रम राबवित असते. अभिजात मराठी भाषा सप्ताह हा या उपक्रमातील मानबिंदू असून, नागरी सहभागातून मायबोली मराठीचा प्रचार-प्रसार अधिक दृढ होईल. नागरिकांनी महापालिकेच्या अशा सर्व उपक्रमांत सहभागी होऊन आपले योगदान द्यावे.”
— विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका







