१७२ ठिकाणी किऑस्क; ३४६३ नागरिकांनी घेतली योजनांची माहिती
काशिनाथ शिंदे
पुणे : वीजग्राहकांना महावितरणच्या विविध सेवा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सौरऊर्जा योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि अर्ज प्रक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा सेतू अभियाना’ला पुणे परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे परिमंडलात १७२ ठिकाणी उभारण्यात आलेल्या किऑस्कला आतापर्यंत ३४६३ नागरिकांनी भेट दिली असून, १७५० वीजग्राहकांनी छतावरील सौर प्रकल्पासाठी अर्ज केले आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रभागांमध्ये, तसेच ग्रामीण भागातील तालुक्यांच्या ठिकाणी महावितरणकडून सेवा सेतू अभियानांतर्गत किऑस्क उभारण्यात आले आहेत. या किऑस्कच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० याबाबत नागरिकांना माहिती व मार्गदर्शन दिले जात आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, अनुदान व आर्थिक लाभ, सौर प्रकल्पाची क्षमता, अंदाजित खर्च, कर्ज सुविधा तसेच अधिकृत सौर कंत्राटदारांची माहितीही किऑस्कवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत १ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, २ किलोवॅटसाठी ६० हजार रुपये, तर ३ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. तर ज्या वीजग्राहकांचा मासिक वीज वापर १०० युनिटच्या आत आहे, अशा ग्राहकांना SMART योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील ग्राहकांना १० हजार रुपये, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील ग्राहकांना ५ हजार रुपये, तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना केवळ २५०० रुपयांत १ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प घराच्या छतावर बसविता येतो.
१ किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पातून दरमहा सरासरी १२० युनिट वीज निर्मिती होऊ शकते. त्यामुळे पात्र ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार वीजबिलात मोठी बचत होण्यास मदत होते.
सौर प्रकल्पासाठी ग्रामीण भागातून सर्वाधिक ७२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापाठोपाठ गणेशखिंड शहर मंडलातून ६१४ आणि रास्तापेठ शहर मंडलातून ४१२ अर्ज प्राप्त झाले आहेत. सेवा सेतू अभियानांतर्गत उभारण्यात आलेले किऑस्क १७ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध राहणार आहेत.
नागरिकांनी आपल्या जवळच्या किऑस्कला भेट देऊन प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना तसेच स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजनेची माहिती घ्यावी आणि पात्रतेनुसार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.






