बाळासाहेब गोतारणे यांचा निर्धार; शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत प्रभावी पाठपुरावा करण्याचे आश्वासन
काशिनाथ शिंदे
पुणे : महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशनच्या वतीने पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी करणारे बाळासाहेब गोतारणे यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि शाळांच्या विविध प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे वाचा फोडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव असलेल्या शिक्षकानेच शिक्षकांच्या अडचणी आणि विद्यार्थ्यांच्या गरजा अधिक संवेदनशीलतेने समजून घेता येतात. त्यामुळे “शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा” ही आपली ठाम भूमिका असल्याचे गोतारणे यांनी सांगितले.
“माझी उमेदवारी केवळ आमदार होण्यासाठी नाही. शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे, ग्रामीण तसेच मराठी माध्यमाच्या शाळांना बळकटी मिळावी आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रभावी आवाज निर्माण व्हावा, या व्यापक उद्देशाने मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे,” असे गोतारणे यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य
जुनी पेन्शन योजना, अनुदान, वेतन व सेवा-सवलती, पदोन्नती, वरिष्ठता, संचमान्यता, रिक्त पदे, अतिरिक्त शिक्षकांचे प्रश्न तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी यांसह शिक्षकांवरील वाढता गैरशैक्षणिक कामाचा भार कमी करण्यासाठी ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे गोतारणे यांनी नमूद केले.
“शिक्षकांनी आपले आयुष्य विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे त्यांच्या सेवा-सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि निवृत्तीनंतरच्या सुरक्षित भविष्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशनच्या माध्यमातून संघटितपणे आणि लोकशाही मार्गाने सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण, मराठी माध्यमाच्या शाळांना बळ देणार
ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही बाबतीत शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा कमी नाहीत. योग्य सुविधा, मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवू शकतात. त्यामुळे ग्रामीण आणि मराठी माध्यमाच्या शाळांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे गोतारणे यांनी सांगितले.
“गावातील शाळा ही त्या गावाच्या विकासाचे केंद्र असते. विद्यार्थी संख्या कमी झाली म्हणून शाळेचे सामाजिक महत्त्व कमी होत नाही. ग्रामीण आणि मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या, सक्षम झाल्या आणि गुणवत्तापूर्ण झाल्या पाहिजेत. त्यासाठी शासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर
विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ परीक्षा आणि गुणांपुरते मर्यादित न राहता त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे असावे, अशी भूमिका गोतारणे यांनी मांडली. कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, कौशल्य शिक्षण आणि मूल्यशिक्षणाला शिक्षण व्यवस्थेत योग्य स्थान मिळाले पाहिजे.
ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा साहित्य आणि कला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणारे शिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांवर विश्वास आणि सन्मानाची गरज
“शिक्षक हा समाज घडविणारा घटक आहे. शिक्षकांकडून गुणवत्तापूर्ण कामाची अपेक्षा करताना त्यांना आवश्यक साधने, प्रशिक्षण आणि विश्वासाचे वातावरणही दिले पाहिजे. शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ अनावश्यक प्रशासकीय आणि गैरशैक्षणिक कामात खर्च होणार नाही, याची काळजी शासनाने घेतली पाहिजे,” असे गोतारणे यांनी नमूद केले.
शिक्षकांचा सन्मान, त्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण आणि शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदल यासाठी महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशन सातत्याने कार्यरत राहील, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षकांचा सहभाग वाढविण्याची मागणी
शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि समाज या सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित धोरणे ठरविताना प्रत्यक्ष शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचे मत आणि अनुभव गांभीर्याने विचारात घेतले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“शिक्षणाच्या धोरणांमध्ये शिक्षकांचा सहभाग वाढला पाहिजे. शाळेतील वास्तव परिस्थिती समजून घेऊन निर्णय घेतले तरच ते प्रभावीपणे अंमलात येऊ शकतात,” असे गोतारणे यांनी स्पष्ट केले.
“प्रश्न मांडणारच नाही, तर ते सुटेपर्यंत पाठपुरावा करणार”
विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करणे ही जबाबदारीची पहिली पायरी आहे. संबंधित विभागांशी संवाद साधणे, शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे आणि आवश्यकतेनुसार लोकशाही मार्गाने संघर्ष करून प्रश्न मार्गी लावणे ही लोकप्रतिनिधीची खरी भूमिका असल्याचे गोतारणे यांनी सांगितले.
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या स्थानिक तसेच विभागीय प्रश्नांना विधान परिषदेत आवाज देण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
“माझा विजय म्हणजे शिक्षकांच्या प्रश्नांचा विजय”
“शिक्षकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विधान परिषदेत पाठविले, तर तो माझा वैयक्तिक विजय नसेल. तो शिक्षकांच्या हक्कांचा, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, शाळांच्या सक्षमीकरणाचा आणि शिक्षणव्यवस्थेतील सकारात्मक बदलाचा विजय असेल,” असे गोतारणे यांनी सांगितले.
शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य आणि शाळांचे सक्षमीकरण या तीन प्रमुख मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशनच्या विचारधारेनुसार काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिक्षकांचा आवाज विधान परिषदेत पोहोचविण्यासाठी साथ देण्याचे आवाहनही गोतारणे यांनी शिक्षकांना केले.






