मुंबईहून आणलेल्या रोकडवर डल्ला; बनावट चावीने कार उघडली, चोरीची संपूर्ण रक्कम हस्तगत
काशिनाथ शिंदे
रावेत : रावेत परिसरात उभ्या असलेल्या कारमधून ५० लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या आठ तासांत अटक केली. गुन्हे शाखा युनिट-२, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चोरीची संपूर्ण ५० लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली. बनावट चावीचा वापर करून कारमधील रोकड लंपास केल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी रात्री १०.५० ते १० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.१५ या कालावधीत पुनावळे येथील संदीप हॉटेलसमोरील सिमेंट काँक्रिट रस्त्यावर एक कार उभी होती. या कारचे कुलूप बनावट चावीच्या साहाय्याने उघडून आतील बॅगेत ठेवलेली ५० लाख रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्हीच्या आधारे तपासाला गती
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासासाठी स्वतंत्र पथके तयार केली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली असता, एक व्यक्ती बनावट चावीने कार उघडून रोकड असलेली बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
फिर्यादीसोबत मुंबईला पैसे आणण्यासाठी गेलेल्या चारुदत्त शिवाजी बेंडाले (वय ३०, रा. निघोजे, ता. खेड) याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपला मित्र प्रसाद शिवाजी बनकर (वय २९, रा. चिंबळी, ता. खेड) याला कारची बनावट चावी दिली होती. तसेच कारमध्ये ५० लाख रुपये असल्याची माहिती देऊन चोरी करण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
चिंबळीतून दुसऱ्या आरोपीला अटक
चारुदत्त बेंडाले याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रसाद बनकर याला चिंबळी येथून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलिसांनी केली.







