भावनिक सुरक्षा, विश्वास आणि प्रेमळ संवादातून नातेसंबंध दृढ करण्याचा संदेश; चिंतनशील पत्रलेखनातून पालकांनी व्यक्त केल्या भावना
काशिनाथ शिंदे
पिंपरी, पुणे : पालक आणि विद्यार्थ्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत, परस्पर विश्वास, आदर आणि भावनिक जवळीक वाढावी, या उद्देशाने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) ‘पालक व विद्यार्थी संबंध दृढता सभा’ उत्साहात संपन्न झाली. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदअंतर्गत सार्वत्रिक मानवी मूल्य नोडल केंद्राच्या (यूएचव्ही) सहकार्याने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे, मुंबई, नागपूर, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, भुसावळ, जळगाव आणि शिर्डी अशा विविध शहरांतील ८३ पालकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
या वेळी पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. राजेश्वरी कन्नन, विज्ञान विभागप्रमुख डॉ. लीना शर्मा, डॉ. संदीप पाटील, मंजुषा देवकुळे आणि यूएचव्ही सेलचे मार्गदर्शक डॉ. महेश कोलते उपस्थित होते.
सभेतील चिंतनशील पत्रलेखन उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून पालकांनी आपल्या पाल्यांविषयी असलेले प्रेम, स्नेह, आशा, अपेक्षा, कौतुक आणि मनातील भावभावना पत्रांच्या माध्यमातून व्यक्त केल्या. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमधील भावनिक नात्याचे महत्त्व अधोरेखित झाले.
डॉ. राजेश्वरी कन्नन यांनी उच्च माध्यमिक शिक्षणानंतर पालक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यांमध्ये होणाऱ्या बदलांवर प्रकाश टाकला. मुलांचे वाढते वय, त्यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य, विकसित होणारा दृष्टिकोन आणि स्वायत्ततेची गरज पालकांनी समजून घ्यावी. त्याचबरोबर मुलांना भावनिक सुरक्षितता, विश्वास आणि योग्य मार्गदर्शन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. लीना शर्मा यांनी पालकांनी पाल्यांशी प्रेमळ आणि मोकळा संवाद साधण्याचे आवाहन केले. परस्पर सामंजस्य आणि सामायिक जबाबदारीला प्रोत्साहन देत घरात असे वातावरण निर्माण करावे, की मुलांना आपल्या चिंता, चुका आणि आव्हानात्मक परिस्थितींबाबत पालकांशी मनमोकळेपणाने बोलता आले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. संदीप पाटील यांनी शैक्षणिक तसेच दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत विचारप्रवर्तक चर्चा केली. तर समन्वयक मंजुषा देवकुळे यांनी सार्वत्रिक मानवी मूल्यांचे महत्त्व विशद केले. कोणतेही नातेसंबंध टिकवण्यासाठी विश्वास, आदर, स्नेह, काळजी आणि योग्य मार्गदर्शन ही मूल्ये अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पालक आणि विद्यार्थ्यांमधील नाते केवळ अपेक्षांवर नव्हे, तर विश्वास, संवाद आणि भावनिक समजूतदारपणावर आधारित असावे, हा महत्त्वपूर्ण संदेश या सभेतून देण्यात आला.







