अग्निशमन दलाची तातडीने धाव; रहिवाशांची सुखरूप सुटका, मोठ्या प्रमाणात घरगुती साहित्याचे नुकसान
काशिनाथ शिंदे
पिंपरी: पिंपळे सौदागर येथील साई मेरीगोल्ड सोसायटीमधील एका फ्लॅटला भीषण आग लागल्याची घटना घडली. ए-७०४ क्रमांकाच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून सुरू झालेली आग काही वेळातच संपूर्ण घरात पसरली. आगीदरम्यान घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत बचावकार्य केल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, बाल्कनीतून सुरू झालेली आग घरातील इन्व्हर्टर बॅटरी, एसी, टीव्ही आणि अन्य साहित्यापर्यंत पोहोचली. याचदरम्यान गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. आगीची माहिती मिळताच रहाटणी उप अग्निशमन केंद्रातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नेहरूनगर आणि मुख्य अग्निशमन केंद्रातील पथकांनाही पाचारण करण्यात आले.
अग्निशमन जवानांनी होजरील आणि होजच्या साहाय्याने पाण्याचा जोरदार मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. तसेच फ्लॅटमधील नागरिकांची सुखरूप सुटका केली. आग पूर्णपणे विझवल्यानंतर जवानांनी घटनास्थळाची पाहणी करून पुन्हा आग भडकण्याचा किंवा अन्य धोका नसल्याची खात्री केली.
या आगीत एसी कॉम्प्रेसर, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरी, विद्युत वायरिंगसह घरातील अन्य साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेषतः एसी कॉम्प्रेसर आणि टीव्ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, सणासुदीच्या काळात घरगुती गॅस सिलिंडर वापरताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन अग्निशमन विभागाने केले आहे. गॅस गळतीचा संशय आल्यास विद्युत उपकरणांचे स्विच सुरू किंवा बंद करू नयेत. गॅसचा मुख्य व्हॉल्व्ह बंद करून दरवाजे आणि खिडक्या उघडाव्यात. तसेच तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा.







