मुख्य अभियंतापदी नियुक्ती; ज्ञानदेव पडळकर यांच्याकडून स्वीकारला पदभार, रास्तापेठ मंडलाच्या अधीक्षक अभियंतापदी अशोक जाधव यांची पदोन्नतीने नियुक्ती
काशिनाथ शिंदे
पुणे: महावितरणच्या पुणे परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी पंकज सुभाष तगलपल्लेवार यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी गुरुवारी (दि. १२) पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे हाती घेतली.
पुणे परिमंडलाचे तत्कालीन मुख्य अभियंता सुनील काकडे यांची कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्य अभियंतापद रिक्त झाले होते. त्यामुळे रास्तापेठ शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. दरम्यान, पडळकर यांना मुख्य अभियंतापदी पदोन्नती मिळाल्याने ते गुरुवारी सायंकाळी कार्यमुक्त झाले.
पंकज तगलपल्लेवार हे यापूर्वी महावितरणच्या मुंबई मुख्यालयातील विशेष प्रकल्प विभागात मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. तेथून प्रशासकीय बदलीने त्यांची पुणे परिमंडलात नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी पुण्यातील गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे पुणे शहरासह परिसरातील वीज वितरण व्यवस्थेचा त्यांना अनुभव आहे. तसेच त्यांनी महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
रास्तापेठ मंडलाची जबाबदारी अशोक जाधव यांच्याकडे
ज्ञानदेव पडळकर यांना मुख्य अभियंतापदी पदोन्नती मिळाल्याने रिक्त झालेल्या रास्तापेठ शहर मंडलाच्या अधीक्षक अभियंतापदी अशोक जाधव यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी गुरुवारी दुपारी ज्ञानदेव पडळकर यांच्याकडून पदभार स्वीकारला.







