मराठी पत्रकार संघाचा गौरव; शनिवारी निगडीतील मठात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार सन्मान
काशिनाथ शिंदे
पिंपरी : निःस्वार्थ प्रेम, माया, करुणा आणि मानवतेच्या सेवेतून देश-विदेशात माणुसकीचा संदेश पोहोचविणाऱ्या विश्वमाता माता अमृतानंदमयी देवी (अम्मा) यांना मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता निगडी-यमुनानगर येथील माता अमृतानंदमयी मठात हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अम्मा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुढारी माध्यम समूहाचे अध्यक्ष डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव असणार आहेत.
या सोहळ्याला विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, लोकप्रतिनिधी तसेच उद्योजक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये दैनिक सकाळच्या संपादक शीतल पवार, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, पुढारी पुणेचे संपादक सुनील माळी, जय महाराष्ट्र चॅनेलच्या संपादक वृषाली कदम आणि दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळ्ये यांचा समावेश आहे.
तसेच आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार सुनील शेळके, व्ही. जे. डेव्हलपर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जावडेकर, कोहिनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
माता अमृतानंदमयी देवी यांनी प्रेम, करुणा, मानवसेवा आणि आध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून जगभरात मानवतेचा संदेश पोहोचविला आहे. समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी त्यांनी विविध सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या अतुलनीय कार्याचा गौरव करण्यासह मातृत्व, माणुसकी आणि निःस्वार्थ सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी सांगितले.
या जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यास पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी केले आहे.







