पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्यसेवा आणि सायबर सुरक्षेला बळ; स्थायी समितीच्या सभेत विकासकामांना मंजुरी

 

काशिनाथ शिंदे: पिंपरी

पिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुविधा आणि नागरिक सेवांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पाणीपुरवठा, रस्ते व बीआरटीएस मार्गांची देखभाल, आरोग्य सुविधा, सायबर सुरक्षा, क्षेत्रीय कार्यालये, उद्यान विभाग तसेच विविध सार्वजनिक व सांस्कृतिक उपक्रमांशी संबंधित प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

महापालिकेच्या संगणक यंत्रणेची सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी तीन हजार अँटी-व्हायरस प्रणाली खरेदी करण्यास तसेच पुढील तीन वर्षांसाठी सपोर्ट स्टाफ नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे महापालिकेच्या विविध विभागांतील संगणकीय प्रणालींची सुरक्षा, देखभाल आणि तांत्रिक सहाय्य अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

शहरातील महत्त्वाच्या रस्ते व बीआरटीएस मार्गांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली. नाशिक फाटा उड्डाणपुलाची स्थापत्यविषयक दुरुस्ती, तसेच नाशिक फाटा ते वाकड या कॉरिडॉर क्रमांक तीनमधील रस्त्याची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. औंध-रावेत बीआरटीएस मार्गाचे मूल्यमापन करून बसथांबे व मार्गावरील स्थापत्य सुविधांचे मानांकन वाढविण्यासाठी आवश्यक कामांनाही मंजुरी देण्यात आली.

महापालिकेच्या आठ प्रभाग समित्यांची पुनर्रचना करून दहा क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. त्यानुसार नव्याने कार्यान्वित झालेल्या ‘लोहगड’ क्षेत्रीय कार्यालयासाठी फर्निचरस्थापत्यविषयक कामे करण्यास मान्यता देण्यात आली. प्रभाग समिती सभागृह, प्रभाग अध्यक्ष कक्ष, क्षेत्रीय अधिकारी व लेखा विभागासाठी कक्ष, कॅश काउंटर तसेच स्थापत्य व विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसाठी कार्यालयीन व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे.

महापालिका रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ऑर्थोपेडिक इम्प्लांट्स खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच कान, नाक व घसा विभागातील डेब्रायडर ऑटोलॉजी मायक्रोड्रिल आणि स्टेप्स ड्रिल सिस्टिम या उपकरणाचा हमी कालावधी संपल्याने पुढील एक वर्षासाठी सर्वसमावेशक देखभाल-दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात आली.

See also  काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

प्रभाग क्रमांक १२ मधील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन-संकलन व्यवस्था तसेच महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी मंडप व अन्य अनुषंगिक व्यवस्था करण्यास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक एकमधील विविध महापालिका कार्यक्रमांसाठीही मंडप व्यवस्था करण्यास मान्यता देण्यात आली.

मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसरासाठी उच्चदाब वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली. परिसरात फसाड लाईटिंग, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा, आकर्षक एलईडी प्रकाश व्यवस्था यांसह विविध विद्युत सुविधा प्रस्तावित आहेत.

प्रभाग क्रमांक १० मधील प्लॉट क्रमांक १६, एमआयडीसी परिसरातील रस्ते आधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी क्यूसीबीएस पद्धतीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यासही मंजुरी देण्यात आली.

 

उद्यान विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन यापूर्वी कार्यरत असलेल्या पाच उद्यान अधिकारी आणि तीन सहाय्यक उद्यान अधिकाऱ्यांची सहा महिन्यांसाठी मानधन तत्त्वावर तात्पुरती पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. शहरातील ३० डीपी रस्त्यांचे सुशोभीकरण आणि दोन लाख देशी झाडांची लागवड यासह विविध कामांच्या अंमलबजावणीसाठी या अनुभवी मनुष्यबळाचा उपयोग केला जाणार आहे.

महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ सात दिवस आयोजित करण्यास मंजुरी देण्यात आली. कार्यक्रमात कलाकारांचे कार्यक्रम, व्याख्याने, कवी संमेलन, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, एलईडी स्क्रीन, पुस्तक खरेदी, भोजन व्यवस्था आणि प्रसिद्धीचा समावेश राहणार आहे.

पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मधील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक रस्त्याच्या विकासकामासोबत पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. वाढती लोकसंख्या, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक व व्यापारी विकास आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अधिक क्षमतेच्या डी.आय. जलवाहिन्या टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संबंधित प्रस्ताव महापालिका सभेकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विविध पाण्याच्या टाक्या, जलक्षेत्र आणि वितरण व्यवस्थांच्या परिचालन, देखभाल व दुरुस्तीच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली. यामध्ये बोपखेल, पांजरपोळ, गुळवेमैदान, दिघी, पिंपळे निलख, थेरगाव, वाकड-भगवाननगर-काळाखडक, श्रीनगर, पिंपरीनगर, पिंपरी गाव, पाटीलनगर-चिखली, जाधववाडी आदी भागांचा समावेश आहे.

See also  कासारवाडीत जुन्या वादाचा रक्तरंजित उद्रेक! तरुणाला बेदम मारहाण; अॅक्टिव्हाची तोडफोड

‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आनंदनगर, संभाजीनगर, मोहननगर आणि काळभोरनगर-आकुर्डी परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी आवश्यक मजूर, महापालिका टँकरसाठी वाहनचालक तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे उपलब्ध करून देण्यासही मंजुरी देण्यात आली.

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले, “नागरिकांना नियमित व सक्षम पाणीपुरवठा, सुस्थितीत रस्ते व बीआरटीएस सुविधा आणि महापालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक उपचार साहित्य उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य आहे. त्याचबरोबर महापालिकेची डिजिटल सुरक्षा मजबूत करणे, नव्या क्षेत्रीय कार्यालयांमधून नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देणे आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. प्रशासकीय कार्यक्षमता, सेवांची गुणवत्ता आणि नागरिकहित या तीन बाबींना केंद्रस्थानी ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थायी समिती सातत्याने कार्यरत राहील.”

 

 

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!